मुंबईः
संपुर्ण देशात १८ वर्षांवरील सगळ्यांना कोरोना लस देण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारने देखील मोफत लसीकरण केले जाणार अशी घोषणा केली आहे. मात्र, राज्याला मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे १ मे पासून राज्यात लसीकरण सुरू होणार नाही, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (२८ एप्रिल) झाल्यानंतर राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे. राज्यात सर्वांचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र लगेच मोठ्या प्रमाणावर लस मिळणार नसल्याने राज्यात १ मेला रोजी लसीकरण होईलच असं नाही अशी शंका राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.
‘१ मे ला राज्यात लसीकरण सुरू होणार नाही. आज लगेच आपल्याला लसीचे डोस उपलब्ध होणार नाहीत. मे अखेरपर्यंत जर लसीचे डोस उपलब्ध होणार असतील, तर त्यांना अचानक एकाच वेळी लसीचे डोस देता येणार नाहीत. त्यामुळे तरुणांना माझं नम्र आवाहन आहे की आपण सगळ्यांना मोफत लसीकरण करतो आहोत. पण आता समजुतदारीने काम घ्यावं लागणार आहे. नोंदणीसाठी कोविन ॲप वापरणं सक्तीचं आहे. त्यामुळे आधी नोंदणी करूनच नोंदणी केंद्रावर जाता येणार आहे. कुणीही थेट केंद्रावर जाऊन लसीची मागणी करू नये. केंद्र सरकारने नोंदणी बंधनकारक केली आहे’, असं यावेळी राजेश टोपे म्हणाले.
‘वर्गवारीनुसार लसीकरणावर विचार सुरू’
‘आपल्याला इच्छा असूनसुद्धा लसी उपलब्ध होत नसल्यामुळे १ मे ला लसीकरण सुरू करता येणार नाहीये. पण आपण यावर काम करत आहोत. ५ कोटी ७१ लाख लोकांना लसीकरण करायचं आहे. त्यासाठी वरीष्ठ मंत्र्यांची एक समिती याचं सूक्ष्म नियोजन करत आहे. १८ ते २५, २५ ते ३५ आणि ३५ ते ४४ अशा वर्गवारीवर काम सुरू आहे. ३५ ते ४४ हा गट आधी घेता येईल का? याची चाचपणी सुरू आहे. यातले सहव्याधीचे रुग्ण आधी घेता येतील का? यावर देखील विचार सुरू आहे. १८ ते ४४ वयोगटासाठीचे लसीकरण केंद्र वेगळे असतील आणि ४५ वयोगटाच्या पुढचे केंद्र वेगळे असतील’, अशी देखील माहिती राजेश टोपे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली.