बाणेर येथील कोविड हॉस्पिटल मध्ये मृतांच्या अंगावरील दागिने चोरण्याचा प्रकार उघडकीस : चतुःश्रुंगी पोलिसांची कारवाई

0
slider_4552

पुणे :

कोरोना महामारी मध्ये अनेक अचंबित करणाऱ्या घटना घडत आहेत. अनेकांना आपल्या आयुष्याची जमापुंजी करोनाच्या आजारासाठी उपचार करण्या करता खर्च कराव्या लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये देखील काही लोकांना लुटण्याचे काम केले आहे.

बाणेर येथील महापालिकेने सुरू केलेल्या कोविड हॉस्पिटलमध्ये तर मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार समोर आला आहे. कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांना उपचारासाठी तेथे दाखल केल्यानंतर त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. मोठ्या प्रमाणात रुग्णाच्या नातेवाईकांकडून तक्रारी येऊ लागल्यानंतर हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमुळे समोर आला. अत्यवस्थ व मयत झालेल्या रुग्णाच्या अंगावरील दागिने चोरीला जात होते.

शारदा अनिल अंबिलढगे (वय ३६, रा.रहाटणी, थेरगाव) आणि अनिल तुकाराम संगमे (वय ३५, रा. रहाटणीगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत डॉ. मस्कर (रा. बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे. बाणेर येथील कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२० आणि फेब्रुवारी ते मे २०२१ दरम्यान हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर येथे महापालिकने सुरू केलेले कोरोना हॉस्पिटल डॉ. किरण भिसे यांना चालविण्यास दिले आहे. या ठिकाणी डॉ. मस्कर हे कोविड हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय काम पाहतात. या हॉस्पिटलमध्ये एकाच वेळी ३३४ रूग्णांवर एकाच वेळी उपचार दिले जाऊ शकतात. हे हॉस्पिटल फक्त कोविड रुग्णासाठी असल्यामुळे रुग्णांची परिस्थिती पाहून त्यांना उपचार दिले जातात. एकादा का रुग्णांना दाखल करून घेतले की तेथे या ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांना प्रवेश दिला जात नाही.

रुग्णांच्या सेवेसाठी डॉक्टर, नर्स, आया असे कामगार आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांचे नातेवाईकांकडून मौल्यवान ऐवज, मोबाईल चोरीच्या तक्रारी येत होत्या. तसेच, काही मयत झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी देखील दागिने चोरी गेल्याचे सांगितले होते. त्यानुसार काही जणांनी हॉस्पिटलच्या प्रशासनाकडे अर्ज केले होते.

See also  बाणेर येथील स्वराज्य प्रतिष्ठान च्या क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते.

दरम्यान, तक्रारीच्या पार्श्वभूमीवर फिर्यादी डॉ मस्कर यांनी सर्व कर्मचाऱ्यांना बोलवून याबाबत विचारणा केली होती. तसेच, या प्रकाराबद्दल माहिती देण्यास सांगितले. मात्र कोणी काही सांगितले नाही. स्वच्छता व इतर कामे करणाऱ्या कामगारांचे सुपरवायझर श्रवण कुंभार व फिर्यादी यांनी हॉस्पिटलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी आरोपी शारदा अंबिलढगे ही रुग्णाच्याजवळ जाऊन पडदा लावून काम करताना दिसली.

तिच्याकडे विचारणा केली असता तिने चोरी केली नसल्याचे सांगितले. तिच्यावर संशय आल्यामुळे तिला डिसेंबर महिन्यात कामावरून काढून टाकले. पण, नंतर दोन महिने आया न मिळाल्यामुळे पुन्हा तिला कामावर घेतले. त्यानंतर पुन्हा रुग्णांच्या अंगावरील दागिने चोरीच्या तक्रारी येऊ लागल्या. त्यानंतर सीसीटीव्हीत पाहिल्यानंतर चोरीचा हा प्रकार समोर आला. याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करून दागिने चोरणारी महिला व तिच्याकडून ते विकत घेणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राजेश माळेगावेे करीत आहेत.

तक्रार दाखल झाल्यानंतर तत्काळ तपास करून पोलिसांनी एक महिला व तिच्या साथीदाराला अटक केली आहे. कोविड हाॅस्पिटलमध्ये दाखल केलेल्या रुग्णाच्या अंगावरील दागिणे ते चोरी करत होते. चोरी केलेले दागिणे त्यांना परत मिळवून देण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत.
– राजकुमार वाघचाैरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक चतुःश्रृंगी