सुस :
कोकणात अतिवृष्टी झाल्याने मागील काही दिवसांमध्ये पावसाने अगदी अनेकांचे संसारच उध्वस्त केलेत. कोकणात घडलेल्या या हृदयपिळवून टाकणाऱ्या काही घटना ज्यात अनेक नागरिकांचे कुटुंब हे जगण्यासाठी संघर्ष करत आहे. मुळचे मुळशी तालुक्यातील सुस गावचे परंतु उद्योग व्यवसायानिमीत्ताने जिल्हा रायगड तालुका महाड येथील चोचिंदे गावात स्थायिक झालेले रविंद्र चव्हाण यांच्या घरालाही या आपत्तीची झळ पोहचली. ते चालवत असलेल्या इंग्लिश स्कुलच्या ईमारतीलाही पाणी लागले. गावात राहणाऱ्या नागरिकांचे फार मोठे नुकसान झाले. त्यांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून सुस ग्रामस्थांच्या वतीने चोचिंदे गावातील १०० अतिवृष्टीग्रस्त गावक-यांना जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले.
सुस गावातील अथवा तालुक्यातील कोणीही कोकणात गेला तर त्याचं आदरातिथ्य प्रा. कुमुदिनी चव्हाण व सर आपुलकीने करीत असतात. व्यवसायानिमीत्त जरी ते स्थलांतरीत झाले असले तरी सुस गावाची प्रेमाची नाळ त्यांनी तुटु दिलेली नाही. चव्हाण परिवार व चोचिंदे गावाला हानी पोहचल्याचे समजताच सुस गावकरी एकत्र झाले. आपत्तीग्रस्तांना जीवनावश्यक सामान घेऊन हे सर्वजण चोचिंदे गावात पोहचले.
अडचणीच्या काळात सुस ग्रामस्थ धावुन आल्याचे पाहुन चव्हाण परिवार भावुक झाला. गावक-यांनी पाठविलेली मदत पाहुन त्यांना भरून आलं. ग्रामस्थांप्रती प्रा. कुमुदिनी चव्हाण यांनी कृतज्ञता व्यक्त केली. चोचिंदे ग्रामपंचायतीच्या सरपंच अमृताताई सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष रिहान देशमुख, युवक नेते कुणाल चव्हाण यांनी आलेल्या मदतीचे सर्व आपत्तीग्रस्थांना नियोजनबद्ध वाटप केलं. खासदार सुनील तटकरे व पालकमंत्री अदिती तटकरे यांनी यावेळी दुरध्वनीवरून सुस ग्रामस्थ व चोचिंदे ग्रामस्थांशी संवाद साधला.
यावेळी सुस ग्रामस्थांचे वतीने भोर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील चांदेरे, शिवसेना नेते गावर्धन बांदल, मुळशी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुहास भोते, मा. ग्रामपंचायत सदस्य नितीन किसन चांदेरे, चेअरमन गणेश सुतार, नामदेव चांदेरे, सुखदेव चांदेरे, अनिल शेवाळे, मयुर मानमोडे उपस्थित होते.