पुणे :
राज्यातील पुणे जिल्हा परिषदेसह २५ जिल्हा परिषदांची मुदत मार्च महिन्यात संपुष्टात येत आहे. जिल्हा परिषदांवर मुख्य कार्यकारी अधिकारी( CEO) यांची तर पंचायत समित्यांवर गट विकास अधिकारी (BDO) यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
जिल्हा परिषदेचा कार्यकाल २० मार्च रोजी तर पंचायत समितीचा कार्यकाल १३ मार्च रोजी समाप्त होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय न घेण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला राज्यपालांनी मंजुरी दिली. त्यामुळे यावर शिक्कामोर्तब झाले. त्यातच राज्य शासनाने सहा महिने निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. पाच वर्षांपूर्वी २१ फेब्रुवारी रोजी या निवडणुका घेण्यात आल्या होत्या.
ओबीसी आरक्षण पेचामुळे मुदत संपणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका मुदतीत न होण्याची शक्यता बळावली. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट झाले होते.
मुंबई महापालिके सह ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती, अकोला, नाशिक व सोलापूर या दहा महानगरपालिकांची मुदत मार्चमध्ये संपत आहे. त्यांच्यावर सुध्दा प्रशासक नियुक्त केले जातील.