नवी दिल्ली:
यूपी, उत्तराखंडसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा (Congress) दारुण पराभव झाल्यानंतर पक्षीय पातळीवर आढावा घेण्याचा फेरा सुरू आहे.
पक्षाच्या खराब कामगिरीनंतर कार्याध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षाच्या पाचही राज्यांच्या प्रमुखांना राजीनामा देण्यास सांगितले आहे.
पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज ही माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट केले की, “काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरच्या राज्यातील अध्यक्षांना राजीनामे देण्यास सांगितले आहे. जेणेकरून राज्य काँग्रेस समित्यांची पुनर्रचना करता येईल”. सोनिया गांधींनी घेतलेल्या बैठकीनंतरचा हा पहिला मोठा निर्णय आहे. पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिद्धू यांचाही पाच राज्यांच्या पक्षप्रमुखांमध्ये समावेश आहे.
पंजाबमधील विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसला आम आदमी पक्षाकडून (आप) दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. इतर चार राज्यांत भाजपने काँग्रेसला चारी मुंड्या चित केले आहे. पक्षाला सर्वात मोठा धक्का बसला तो राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या राज्यात, यूपीमध्ये, जिथे पक्षाला केवळ दोन जागा मिळू शकल्या. एवढेच नाही तर या राज्यात पक्षाच्या मतांची टक्केवारीही ६.५ टक्क्यांवर आली आहे. गेल्या रविवारी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या (CWC) बैठकीत काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला होता आणि त्यांना संघटनात्मक निवडणुका संपेपर्यंत पदावर राहण्यास आणि पक्ष मजबूत करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास सांगितले होते.
या पाच राज्यातील अध्यक्षांचा घेतला राजीनामा
गोवा – गिरीश चोडणकर
पंजाब- नवज्योतसिंग सिद्धू
उत्तर प्रदेश- अजय लल्लू
उत्तराखंड- गणेश बोदियाल
मणिपूर- एन लोकेन सिंग