पुणे :
वेताळ टेकडी पुण्याचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याला धक्का लावण्याचे काम पुणे महापालिकेकडून होत आहे. पुणे महापालिका वेताळ टेकडीमधून दोन बोगदे, दोन रस्ते तयार करणार आहेत. त्यासाठी टेकडीला फोडणार आहेत. त्यामुळे टेकडीची जैवविविधता नष्ट होईल. तसेच भूजलावरही परिणाम होणार असल्याने नागरिक व पर्यावरणप्रेमींनी या प्रकल्पाला जोरदार विरोध म्हणून हजारो पुणेकर वेताळ टेकडीच्या संरक्षणासाठी एकत्र आले. महापालिकेने टेकडीवरील सर्व प्रस्ताव रद्द करावेत, अशी मागणी टेकडीप्रेमींनी रविवारी (दि.१ मे) सकाळी केली.
१ मे रोजी सकाळी साडेसात वाजता वेताळ टेकडीवर आपला मारुती मंदिरासमोर निषेध अभियान राबविण्यात आले. हजारो पुणेकर सहभागी झाले होते.
पीएमसीने वेताळ टेकडीवर एक नव्हे तर तीन विनाशकारी प्रकल्पांचे नियोजन केले आहे:
1. बालभारती पौड फाटा रस्ता – लॉ कॉलेज टेकडी उतारावरील पृष्ठभाग रस्ता,
2. HCMTR – लॉ कॉलेज टेकडी उतारावरील उन्नत रस्ता
3. सुतारधारा, पंचवटी आणि गोखलेनगर येथे बाहेर पडणारे दोन बोगदे.
या प्रकल्पांना निसर्ग प्रेमी पुणेकरांनी निषेध व्यक्त करत जोरदार विरोध दर्शवला आहे.
सार्वजनिक वाहतूक सक्षम करा
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हे प्रकल्प असल्याचे पालिका म्हणते आहे. पण या प्रकल्पांमुळे कोंडीवर काहीच फरक पडणार नाही, त्यामुळे सार्वजनिक वाहतूक सक्षम केली, तरच त्यातून मार्ग निघेल, असे पर्यावरणप्रेमी पुष्कर कुलकर्णी, तुषार श्रोते, रवी सिन्हा, वैशाली पाटकर यांनी सांगितले.
लहान मुलांपासून ते वृद्ध स्त्री-पुरुषांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांनी हे प्रकल्प कार्यान्वित झाल्यास उद्भवणाऱ्या विविध समस्यांचे चित्रण करणारे रंगीत पोस्टर्स हातात धरले होते. शहरी जंगले आणि गवताळ प्रदेश सिमेंट आणि काँक्रीटने बदलले तर त्यांच्या पिढीला हवामान बदलाच्या सर्वात वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल म्हणून विशेषतः तरुणांना गंभीर चिंता आहे.
वेताळ टेकडी हे पुण्याच्या भूजलासाठीच्या तीन मुख्य पाणलोट समूहांपैकी एक आहे, कारण ACWADAM च्या 2019 मधील भूगर्भीय संशोधनात या पाणलोट क्षेत्रासाठी “कोणतीही तडजोड न करण्याची” शिफारस करण्यात आली आहे. रस्ते (पृष्ठभाग किंवा उन्नत) आणि बोगदे आपल्या शहराच्या भूजल संसाधनाला हानी पोहोचवतील. म्हणुनच महपालिकेने हे विनाशकारी प्रकल्प त्वरित रद्द करावेत अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.
या प्रकल्पाला ग्रीन पुणे मूव्हमेंट, डेक्कन जिमखाना परीसर समिती, पाषाण क्षेत्र सभा, औंध विकास मंडळ, पंचवटी उत्कर्ष सेवा संस्था, बाणेर पाषाण लिंक रोड विकास समिती, नगर रोड सिटीझन्स फोरम असोसिएशन, एरिया सभा असोसिएशन ऑफ पुणे, सेव्ह पुणे ट्रॅफिक मुव्हमेंट , परिवर्तन , मिशन भूजल , वसुंधरा स्वच्छता अभियान , देवनदी स्वच्छता अभियान , रामनदी स्वच्छता अभियान , 51A ग्रुप , जीवननदी फाऊंडेशन , परिसर , कल्पवृक्ष , वॉरियर मॉम्स , आनंदवन फाउंडेशन यांनी विरोध केला आहे.