नवी दिल्ली :
रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या गाडीचा फोटो पाठवा आणि 500 रुपये मिळवा अशी महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. यासाठी लवकरच कायदा आणण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
दिल्लीतील इंडस्ट्रियल डीकार्बनायझेशन समिट या कार्यक्रमामध्ये बोलताना नितीन गडकरींनी ही घोषणा केली आहे.
आपल्या देशात अनेक शहरांमध्ये कार पार्किंगविषयी नागरिकांना शिस्त नसल्याचं वेळोवेळी दिसून येतंय. मिळेल त्या ठिकाणी गाडी पार्क करण्याकडे लोकांचा कल असतो. त्यामुळे ट्रॅफिकची समस्या निर्माण होऊ शकते. म्हणून आता अशा प्रवृत्तीविरोधात नवीन कायदा आणण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचं नितीन गडकरींनी सांगितलं.
नितीन गडकरी म्हणाले की, “मी एक कायदा करणार आहे. जो व्यक्ती चुकीच्या पद्धतीने रस्त्यावर गाडी उभी करेल त्याला 1000 रुपये दंड लावण्यात येईल. त्याचवेळी त्या गाडीचा फोटो काढून पाठवणाऱ्या व्यक्तीला 500 रुपयांचे बक्षीस देण्यात येईल.”
नितीन गडकरी म्हणाले की, “माझ्या आचाऱ्याकडे दोन सेकंड हॅन्ड गाड्या आहेत, चार लोकांच्या कुटुंबाकडे सहा गाड्या आहेत. त्या तुलनेत दिल्लीवाले खूप सुखी आहेत. त्यांच्या गाड्यांच्या पार्किंगसाठी आम्ही रस्ते बनवले आहे.”
अनेक लोक आपल्या गाडीसाठी पार्किंगची सोय करत नाहीत, त्या ऐवजी गाडी रस्त्यावर उभी करतात असं नितीन गडकरी म्हणाले.