पुणे :
पुणे पोलिसांनी संगमवाडी येथे टेम्पोमधून तब्बल साडे सतरा लाखांचा रेशनिंगचा साठा जप्त केला आहे. पुणे आयुक्तालयाच्या खंडणी दरोडा विरोधी पथक एक यांनी शनिवारी (दि.27) हि कारवाई केली.
यामध्ये पोलिसांनी वाहन चालक संतोषकुमार जयहिंद मोरे, प्रेमचंद जैन, संतोषी रुपचंद सोलंकी, प्रकाश रुपचंद सोलंकी, प्रमोद रुपचंद सोलंकी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना खबर मिळाली की, सरकारी रेशनिंगचा तांदूळ हा संगमवाडी येथे खाली करून छुप्या पद्धतीने पॉलीथीन बॅगमध्ये भरून बेकादेशीर रित्या विक्रीला नेला जातो. त्यासाठी संगमवाडी येथे शनिवारी तो टेम्पो येणार असल्याची खबर मिळाली. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाने संगमवाडी येथील गोदामावर छापा मारला. तेथे टाटा कंपनीचा एमएच 43 वाय 2320 हा टेम्पो तांदळ्याच्या पोत्यांनी गच्च भरलेला अढळून आला. यावेळी टेम्पो चालकाला चौकशी केली असता त्याने पद्मावती फाऊंडेशनचे मालक प्रेमचंद जैन यांच्या सांगण्यावरून गोदामला टेम्पो आणल्याचे सांगितले.
यावेळी पोलिसांनी 17 लाख 41 हजार 364 रुपये किंमतीचे 160 क्विंटल तांदूळ, 57.5 क्विंटल गहू व इतर मुद्देमाल जप्त केला. येरवडा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा पुढिल तपास खंडणी विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील करत आहेत.
ही कारवाई खंडणी विरोधी पथक एक चे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, पोलीस अंमलदार प्रमोद सोनावणे, सयाजी चव्हाण, नितीन कांबळे,किरण ठवरे, दुर्योधन गुरव,अमोल आवाड,विजय कांबळे, राजेंद्र लांडगे यांनी केली.