औंध :
यावर्षी 31 ऑगस्ट 2022 रोजी म्हणजेच बुधवारी आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झाले. मोठया उत्साहात सर्वांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे स्वागत केले. गणपती आगमनानंतर 3 सप्टेंबर रोजी गौरीचे आगमन होईल. या निमीत्ताने माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील औंध, बाणेर, बालेवाडी, सोमेश्वरवाडी, पाषाण, सुतारवाडी या परिसरातील नागरिकांसाठी घरगुती ‘गौरी-गणपती सजावट स्पर्धा ‘ आयोजित केल्या आहेत.
या स्पर्धेची माहिती देताना माजी नगरसेवक सनी निम्हण म्हणाले की, आपल्याकडे गौरी- गणपतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गौरी गणपतीसाठी भक्त सूुंदर अशी आरास तयार करतात. घरोघरी या उत्सवाचा जल्लोष असतो. लॉकडाऊननंतर गणेशोत्सव पहिल्यांदा दणक्यात व उत्साहात साजरा करण्यात येत आहे त्यामुळे सर्वत्र चैतन्याचे वातावरण आहे. आम्ही देखील दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील घरगुती ‘गौरी-गणपती सजावट स्पर्धा’ आयोजित करत आहोत. आम्हाला खात्री आहे की, दरवर्षी प्रमाणे आपण यावर्षी देखील या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद द्याल व तितक्याच उत्साहाने सहभागी व्हाल.
या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे व प्रत्येक सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. आपण 8308123555 क्रमांकावर संपर्क साधून स्पर्धेत सहभागी व्हावे असे आव्हान माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी केले आहे.