बालेवाडी :
म्युझियम ऑफ कॉन्टेम्परोरी आर्ट आणि बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन यांनी बालेवाडीतील सर्व सोसायटीतील मुलांसाठी “रंग-धनु सिझन २” चित्रकला स्पर्धा नुकतीच आयोजित केली होती. या स्पर्धेला अनेक सोसायाटीतून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, गणेशोत्सव असे विषय होते. मुलांनी छान छान कल्पना वापरून सुंदर व अर्थपूर्ण चित्रे रंगवली. म्युझियम ऑफ कॉन्टेम्परोरी आर्टच्या संचालिका वनिता जाधव, फेडरेशनचे अमेय जगताप, आशिष कोटमकर यांनी पुढाकार घेऊन स्पर्धेचे आयोजन केले होते.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अलका चंद्रा, तारे वकील, भारत श्रीवास्तव, मुक्ती गौर, प्रियांका श्रीवास्तव व रमेश रोकडे यांनी विशेष श्रम घेतले.
बक्षीस समारंभ बुधवारी पार पडला. यावेळी “रंग-धनु सिझन २” ची सर्व टीम, फेडरेशनचे पदाधिकारी हजर होते. वनिता जाधव, अशोक नवाल, रमेश रोकडे, सचिन पाटील, माशाळकर वकील आशिष कोटमकर व अमेय जगताप यांच्या हस्ते बक्षिसे दिली गेली. सर्वांनी मुलांचे कौतुक केले. पालक आणि मुलांना स्पर्धा फार आवडली आणि त्यांनी अशी स्पर्धा बालेवाडीत पुन्हा भरवावी अशी आयोजकांना विनंती केली.
बक्षीस वितरणानंतर सुनिता अनिल केळकर यांनी महाराष्ट्राची भूमिकन्या कवयत्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा परिचय करून देणारा “मन वढाय वाढाय” हा भावपूर्ण कार्यक्रम सदर केला. काळजाला भिडणाऱ्या बहिणाबाईंच्या कविता आणि रसाळ रसग्रहण ऐकून श्रोते मंत्रमुग्ध झाले. बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन आणि वनिता जाधव आर्ट फौंडेशन चा हा कार्यक्रम श्रोत्यांना फार आवडला.