पुण्यात एलआयसी मुख्यालयाबाहेर आम आदमी पार्टीची निदर्शने

0
slider_4552

पुणे :

बॅलन्स शीट, शेअर्स ब्लॉक डील्स यांची शहानिशा न करता अदानी समूहाला आर्थिक मदत करण्याच्या हेतूने अदानी समूहाच्या समभागांमध्ये चढ्या किमतीने समभाग विकत घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर एलआयसीने सर्वसामान्य नागरिकांचे रु. 41476.5 कोटी (एलआयसी ऑफ इंडियाने उघड केल्यानुसार) गुंतवले आहेत. आता हे समभाग घसरल्याने या गुंतवणुकीमध्ये एलआयसीचे 50 टक्के होऊन अधिक नुकसान झाले आहे. एलआयसी व्यवस्थापकांनी बेजबाबदार व संशयास्पद गुंतवणूक केल्याने 29 कोटी सर्वसामान्य विमाधारकांची एलआयसी मधील गुंतवणूक असुरक्षित झाल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी केला.

अदानी शेअर्स मधील एलआयसीची गुंतवणूक संशयास्पद असून मोठा घोटाळा झाला आहे. त्यात एलआयसी चेअरमन व गुंतवणूक समिती सदस्यांचा सहभाग असल्याचा आम आदमी पक्षाला संशय असून त्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी तक्रार आम आदमी पार्टी- पुणे शहरतर्फे श्रीकांत आचार्य यांनी ईडी व सीबीआय यांच्याकडे करण्यात आली आहे. तसेच आज पुण्यातील एलआयसी मुख्यालयाबाहेर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सप्टेंबर 2012 मध्ये गौतम अदानी यांच्या तीन कंपन्या स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट झाल्या. त्यावेळी समूह कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 48,692 कोटी रुपये होते. ऑगस्ट 2022 पर्यंत अदानी समूहाच्या सात कंपन्या स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध आहेत आणि एकूण मार्केट कॅप 20.31 लाख कोटी रुपयांच्या जवळ आहे. म्हणजेच 2012 ते 2022 पर्यंत म्हणजेच एका दशकात अदानी समूहाचे मार्केट कॅप 42 पटीने वाढले होते. अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे समूहाचे मार्केट कॅप प्रचंड वाढलेले होते. परंतु यामध्ये मोठ्या प्रमाणावर कृत्रिमरीत्या समभागांची किंमत वाढवून घोटाळा केल्याची बाब हिंडनबर्ग रिसर्च रिपोर्टच्या माध्यमातून समोर आली आहे. अदानी समूहाचे कृत्रिमरीत्या फुगवलेले समभाग भारतातील राष्ट्रीयकृत बँका आणि एलआयसीने मोठ्या प्रमाणावर चढ्या किंमतीला खरेदी केलेले आहेत.

See also  पुणे बार असोसिएशन तर्फे 'लॉ ऑफ प्रेसिडेंट अँड ट्रायल कोर्ट प्रॅक्टिस: ज्युडीशीयल डिस्कोर्स' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन...

नामांकित सेन्सेक्स इंडेक्स कंपन्या व ब्लूचिप कंपन्यांमध्ये पब्लिक होल्डिंगपैकी एलआयसीने सरासरी 7 ते 11 % गुंतवणूक केलेली आपल्याला आढळून येते. परंतु अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये एकूण पब्लिक होल्डिंगपैकी एलआयसीने 15 ते 27 % एवढी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केलेली आहे. अदानी पोर्ट या कंपनीत म्युच्युअल फंड यांनी एकत्रितपणे 2.29% गुंतवणूक केले असताना एलआयसीने त्यात तब्बल 9.65% गुंतवणूक केली आहे. अदानी टोटल गॅस या कंपनीत म्युच्युअल फंड यांनी एकत्रितपणे 1.93% गुंतवणूक केली असताना एलआयसीने त्यात 5.96% गुंतवणूक केली आहे. अदानी इंटरप्राईजेस या कंपनीत म्युच्युअल फंड यांनी एकत्रितपणे 6.70% गुंतवणूक केले असताना एलआयसीने त्यात 4.23% इतके गुंतवणूक केली आहे. अदानी समूहातील कंपन्यांवर एलआयसीची विशेष मेहर नजर असल्याचं यातून स्पष्ट होतं.

आम आदमी पार्टी तर्फे अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये झालेल्या ब्लॉक शेअर्स डिल्सचा अभ्यास करण्यात आला. ब्लॉक डील्स म्हणजे जिथे एकाच वेळी पाच लाख समभाग किंवा दहा कोटीहून जास्त मालकीचे समभाग खरेदी केले जातात किंवा विकले जातात. या ब्लॉक डील्स मध्ये मोठ्या प्रमाणावर मॉरिशस स्थित कंपन्यांचा सहभाग आहे तसेच नामसाधर्म असलेल्या काही विशिष्ट कंपन्यांनीच मोठ्या प्रमाणावर या समभागांची खरेदी व विक्री केल्याची बाब सार्वजनिक रित्या उपलब्ध असलेल्या माहितीतून समोर आली आहे. यातून कृत्रिमरीत्या समभागांची किंमत वाढवण्याचा प्रयत्न होत असल्याची बाब स्पष्ट होते. सार्वजनिक रित्या उपलब्ध असलेल्या या माहितीची कोणतीही शहानिशा न करता एलआयसीने मोठ्या प्रमाणावर अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे आणि त्यामुळे एलआयसी मधील 29 कोटी सामान्य विमाधारकांचे पैसे असुरक्षित झाले आहेत. याबाबतचे पुरावे देत आज आम आदमी पार्टी तर्फे श्रीकांत आचार्य यांनी सीबीआय व ईडीकडे लेखी तक्रार दाखल केली असून एलआयसीचे चेअरमन व गुंतवणूक समिती सदस्य यांच्यावर गुन्हे नोंदवावेत अशी मागणी आम आदमी पार्टी तर्फे करण्यात आली आहे.