पुणे :
खेळाडू दत्तक योजनेचा महापालिकेला विसर पडल्याचा आरोप करत राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरद पवार) गटाने खेळाडू दत्तक योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना युवक अध्यक्ष इम्रान शेख म्हणाले, “पिंपरी,-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील उदयोन्मुख आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या खेळाडूंकरिता महापालिकेमार्फेत गेली अनेक वर्ष खेळाडू दत्तक योजना सुरू होती.
या योजनेतून विविध प्रकारच्या क्रीडा प्रकारातील खेळाडूंना महापालिकेकडून आर्थिक हातभार लावला जात होता. परंतु कोविड-19 च्या प्रभावानंतर ही योजना बंद करण्यात आली.
दोन वर्ष उलटून गेले तरी ही योजना पुन्हा सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे शहरातील उद्योन्मुख व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या खेळाडूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.तरी शहराचे व राज्याचे तसेच देशाचे नाव उज्वल करण्याचे सामर्थ्य असणाऱ्या खेळाडूंकरिता योजना पुनर्जीवित करावी.
शहरातील गोरगरीब खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने केली गेली. मागणी मान्य न केल्यास महापालिका प्रशासनाविरुद्ध जन आंदोलन उभे करावे लागेल असा इशारा इम्रान शेख यांनी दिला.”