पुणे :
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी शनिवारी पुणे दौऱ्यावर असताना अनेक कामांची पाहणी केली व प्रलंबित कामांचा आढावा घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. चांदणी चौकातील रखडलेल्या कामाच्या पाहणी नंतर गडकरींनी अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली आणि नंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सर्वात जास्त वाहतूक कोंडी होत असलेल्या पुणे-नगर महामार्गाचा विचार केला असता तिकडे दुमजली उड्डाणपूल गरजेचा असल्याने त्या ठिकाणी वाघोली ते लोणीकंद असा सात किलोमीटर लांबीचा दुमजली उड्डाणपूल लवकरच उभा करणार असल्याची घोषणा गडकरींनी पत्रकारांशी बोलताना केली.
पुणे-नगर महामार्गावरील प्रस्तावित दुमजली पुलाच्या आरेखनाचे काम पूर्ण झाले असून त्यासाठी वेगळे भूसंपादन करण्याची गरज नाही, त्यामुळे हे काम येत्या सहा महिन्यात सुरु होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर वाघोली ते लोणीकंद मार्गावर सोळा लेनद्वारे वाहतूक करण्यात येणार आहे.
पुणे-नगर रस्त्याप्रमाणेच पुणे-औरंगाबाद रस्त्याचेही डायरेक्ट ऍक्सेस डिझाईन करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, हा प्रकल्प 6 हजार कोटी रुपयांचा आहे त्याचबरोबर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर या 54 कि.मी महामार्गासाठी 600 कोटी रुपये मंजूर केले असल्याचेही गडकरींनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.