न्यायमुर्ती पी. बी. सावंत यांचे बाणेर मध्ये वृद्धपकाळाने निधन.

0
slider_4552

बाणेर :

नॅशनल प्रेस डे” चे जनक दिल्ली सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती, वर्ल्ड प्रेस कौन्सिल ( लंडन ) आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया चे माजी अध्यक्ष आणि देश बचाव आघाडी तसेच लोकशासन आंदोलन पार्टीचे संस्थापक मा. न्या. पी.बी.सावंत साहेब यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी अल्पशा आजाराने बाणेर येथे आज निधन झाले. त्यांच्या जाण्याने सामाजिक क्षेत्रात मोठी हानी झाली एक शिस्त प्रिय विचारवंत हरवला. त्यांच्या त्यांच्या पश्चात एक मुलगा व दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.

बॉम्बे युनिव्हर्सिटीतून सावंत यांनी एलएलबीचे उच्चशिक्षण घेतले होते. मुंबई उच्च न्यायालयात वकिली व्यवसायाला सुरूवात केल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिली केली होती. त्यानंतर 1973 साली ते मुंबई हायकोर्टाचे पहिल्यांदा न्यायाधीश झाले. त्यानंतर 1989 साली सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश बनले. 1995 साली निवृत्त झाल्यानंतर ते सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन सहभागी राहिले. ते वर्ल्ड प्रेस कौन्सिल (लंडन) आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे (पीसीआय) माजी अध्यक्ष राहिले होते. देश बचाव आघाडी तसेच लोकशासन आंदोलन पार्टीचे ते संस्थापक होते.

न्या. पी.बी.सावंत साहेबांच्या प्रदीर्घ न्यायालयीन कारकीर्दीनंतर भारत सरकारने त्यांची “प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया”चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. न्याय, नियोजन आणि शिस्त या गोष्टींसाठी प्रसिद्ध असलेले न्या.सावंत साहेबांनी वर्तमानपत्रांना शिस्तीत वागायला शिकविले. अनियंत्रित झालेल्या मिडियाला नियंत्रित केले . त्यांना त्यांचे चारित्र्य जपायला भाग पाडले. आणि “बेंगाल गॅझेटी” या इंग्रजी वर्तमानपत्राने सुरू झालेल्या भारतीय वर्तमानपत्रांच्या सन्मानार्थ १६ नोव्हेंबर हा दिवस “नॅशनल प्रेस डे” म्हणून साजरा केला जावा असा आदेश मा.न्या.पी.बी.सावंत यांनी काढला.

ते न्यायाधीश असताना भारतात केवळ एकच न्यूज चॅनेल होते . ब्रॉडकास्टिंग अर्थात प्रसारण आणि प्रक्षेपणाचे सर्वाधिकार हे केवळ दूरदर्शन या सरकारी वाहिनीला होते. त्यांच्या एका न्यायालयीन निर्णयाने भारताच्या ब्रॉडकास्टिंग व्यवहार ज्ञान क्षेत्राचा विस्तार झाला. आज भारतात हजारो चॅनेल्स आहेत . हा त्यांच्या न्यायालयीन निर्णयाचा परिणाम आहे.

See also  बावधन बुद्रुक येथे श्री खंडोबा देवस्थान मंदिर "चंपाषष्टी उत्सवा" निमित्त धार्मिक कार्यक्रम.