कुलगुरु आणि गुरुकुल पद्धतीवर आपले शैक्षणिक मॉडेल तयार व्हावे : नॅक अध्यक्ष डॉ.भूषण पटवर्धन

0
slider_4552

पुणे :

संशोधनाची सुरुवात पाश्चात्य गोष्टींवर होते, ते आपल्याकडील गोष्टींवर देखील व्हायला हवे. पाश्चात्य विज्ञान कमी नाही, मात्र आपल्या ज्ञानपरंपरा देखील मोठया आहेत. भारतात 14 विद्या आणि 64 कला आहेत, असे आपण म्हणतो.

त्यामुळे भारतीय ज्ञानपरंपरेची ओळख प्रत्येकाला होणे गरजेचे आहे. त्यामुळे कुलगुरु आणि गुरुकुल पद्धतीतील जे चांगले आहे, त्यावर आधारित भारताचे शैक्षणिक मॉडेल तयार व्हावे, असे मत राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेचे (नॅक) नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.भूषण पटवर्धन यांनी व्यक्त केले.

सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार, मुख्य वैज्ञानिक सल्लागार समिती भारत सरकार यांचे कार्यालय आणि विज्ञान प्रसार यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान सर्वत्र पूज्यते या विज्ञान प्रसार महोत्सवाचे आयोजन शिक्षण प्रसारक मंडळीचे सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथे करण्यात आले होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून त्याचा समारोप लेडी रमाबाई हॉलमध्ये सोमवारी झाला.

यावेळी शि.प्र.मंडळीचे अध्यक्ष अ‍ॅड.सदानंद फडके, शि.प्र.मंडळी नियामक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.एस.के.जैन, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, सचिव राधिका इनामदार, विज्ञान भारतीचे जयंत सहस्त्रबुद्धे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कै.प्राचार्य बी.व्ही.भिडे फाऊंडेशनतर्फे प्रा.डॉ.प्रशांत दुराफे आणि डॉ. गौरी साठे यांच्या क्रोनो बायोलॉजी या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी झाले. तसेच महोत्सवातील विजेत्यांना पारितोषिके देखील देण्यात आली.

शि.प्र. मंडळीच्या नियामक मंडळाचे सदस्य अ‍ॅड. मिहीर प्रभुदेसाई, राजेंद्र पटवर्धन, पराग ठाकूर, प्राचार्य डॉ.सविता दातार, विज्ञान भारतीच्या मानसी मालेगावकर, विज्ञानमंडळ प्रमुख डॉ.संदीप काकडे, समन्वयक डॉ.गीतांजली फाटक, डॉ.सुचेता गायकवाड, मंदार उपासनी आणि सर्व प्राध्यापकांनी महोत्सवाचे नियोजन केले होते.

डॉ.भूषण पटवर्धन म्हणाले, आपल्या मनावर, मेंदूवर वेळोवेळी प्रहार होत गेले आहेत. पाश्चात्यांकडून येते, तेच विज्ञान असा विशिष्ट विचारधारेचे प्रभाव आपण आजपर्यंत मानत आलो आहोत. आपल्याकडील ज्ञान कमी दर्जाचे नसून भारतीय विचारांची मोठी परंपरा आपल्याकडे आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील त्याकडे काणाडोळा झाला आहे. भारतीय ज्ञानपरंपरेबद्दल विकिपिडायावर देखील उल्लेख नाही.

See also  बाजार समिती सुरू ठेवण्याच्या उपाययोजना कराव्यात : संचालक सोनी.

ते पुढे म्हणाले, संस्कृती नष्ट करीत भाषेवर हल्ला चढविण्याची ब्रिटिशांची पद्धती होती. त्याला हद्द््पार करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. आत्मसन्मान पुन्हा मिळविण्याचे प्रयत्न देखील आता सुरु आहेत. आयुर्वेद आणि योग याकडे आपण गांभीर्याने पहात नाही. कोविडने आपल्याला धडा दिला आहे की उपचारापेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजना गरजेच्या आहेत. त्यामुळे त्याचा अवलंब आपण करायला हवा.

अ‍ॅड.सदानंद फडके म्हणाले, ब्रिटिशांचे आपल्यावरील गारुड बाजूला काढून आपल्याला सद््विचार जगभरात पोहोचवायचा आहे. ब्रिटिशांनी सांगितलेल्या गोष्टी आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षांपूर्वी सांगितलेल्या आहेत. आपले संशोधन व शोध कितीही चांगला असला, तरी देखील पाश्चात्य चष्म्यातून असल्याशिवाय त्याला मान्यता नाही. त्यामुळे आपले विसरलेले तत्वज्ञान आपण पुन्हा एकदा विज्ञानाने प्रज्वलित करुया.

महोत्सवात ७५ शास्त्रज्ञ आणि ७५ वैज्ञानिक शोध यांची भित्तिचित्रे बघण्यासाठी उपलब्ध होती. तसेच डीआरडीओ यांच्यातर्फे भित्तिचित्रे आणि मॉडेल्स देखील प्रदर्शित करण्यात आली. विज्ञान महोत्सवात विज्ञान व्याख्याने, विज्ञान प्रदर्शन, विज्ञान चित्रपट महोत्सव, विज्ञान पुस्तक मेळा, विज्ञान साहित्य उत्सव, वैज्ञानिक रांगोळी, वक्तृत्व स्पर्धा, विज्ञानामृत प्रश्नमंजुषा अशा नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचा समावेश होता. अ‍ॅड.मिहिर प्रभुदेसाई यांनी प्रास्ताविक केले.