औंध :
औंध येथील इंदिरा वसाहत या ठिकाणी युवाशक्ती आणि सुखाई प्रतिष्ठान च्या वतीने पहिली ते नववी पर्यंत च्या विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका वर्गाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याची बैठक सुखाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी सर्वांना मार्गदर्शन करताना सुखाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश कांबळे म्हणाले की, औंध येथील विविध वसाहतीमध्ये शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे या हेतूने येथे बौद्ध विहार बांधण्यात आली आहेत. अशा विहारात सर्व जाती-धर्माच्या गोर गरीब मुलांना शिक्षण मिळावे म्हणुनच “मोफत अभ्यासवर्ग”सुरू करण्याचा मानस आहे. या विधायक उपक्रमाला पूर्ण पाठिंबा असून हा उपक्रम जास्तीत जास्त वाढीस लागावा ह्या हेतूने प्रयत्न करू असे ते म्हणाले.
यावेळी युवाशक्ती आणि सुखाई प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विधायक उपक्रमाला स्थानिक नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून हा उपक्रम राबवावा अशी अपेक्षा सर्वांनी यावेळी व्यक्त केली.