लंडन :
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे कॅन्सरग्रस्त असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मिळत आहे.
त्यातच आता ब्रिटनच्या गुप्तहेर यंत्रणेने केलेल्या एका दाव्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.
पुतीन यांचा मृत्यू झाला असू शकतो. तो लपवून पुतीन यांचा तोतया रशियन लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सत्तेवर बसवल्याचा दावा ब्रिटनची गुप्तहेर यंत्रणा एमआय 6 ने केला आहे. पुतीन यांच्या मृत्यूची बातमी लपवून ठेवण्यासाठी या काळात पुतीन यांच्या तोतयाला रशियाच्या अध्यक्षस्थानी बसवले आहे. नंतर रशियन लष्कर रशियाशी राजवट ताब्यात घेईल, असा दावाही एमआय 6 ने केला आहे. ब्रिटनच्या मिरर संकेतस्थळाने द डेली स्टारच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. पुतीन यांच्या मृत्यूची बातमी फुटली तर लष्कराला युक्रेन मधून माघारी घ्यावी लागेल. रशियाची नाचक्की होईल, ही भीती रशियन लष्कराला वाटत आहे.
पुतीन यांना रक्ताचा कॅन्सर झाल्याचे काही दिवसांपूर्वी सांगण्यात येत होते. युक्रेनसोबतच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर माहिती देताना पुतीन माध्यमांसमोर आले त्यावेळी त्यांचा चेहरा फुगलेला दिसत असल्याची चर्चा झाली. त्यामुळेच पुतीन यांचा मृत्यू झालेला असू शकतो आणि रशियाकडून ही बातमी लपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची शंका ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा एमआय 6 कडून वर्तवण्यात येत आहे.
पुतीन यांनीच केली नियुक्ती?
ज्यावेळी पुतीन हे माध्यमांसमोर दिसले त्यावेळी तो व्हिडिओ आधीच रेकॉर्ड केलेला असू शकतो आणि रशियाच्या विजय दिनाच्या दिवशी मॉस्कोत दिसलेले पुतीन म्हणजे त्यांचा तोतया (Body Double) असू शकतो अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्वतः पुतीन यांनीच आपण आजारी पडल्यानंतर या तोतयाला आपल्या जागी नियुक्त केल्याची शंकाही व्यक्त करण्यात येत आहे.